*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर, दि. १० सप्टेंबर : “भारताला बलशाही अर्थसत्ता बनवायचा असेल, तर सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणारी आणि विषमता कमी करणारी सर्वसमावेशक अर्थनीती राबविणे अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व माजी राज्यसभा सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले.शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ. जाधव यांना प्रा. (डॉ.) जे. एफ. पाटील स्मृती पुरस्कार कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कारामध्ये ५१ हजार रुपये रोख, मानपत्र, शाल व ग्रंथभेट यांचा समावेश होता.
भाषणाला प्रारंभ करताना आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रज्ञ व सत्कारमूर्ती प्रा.डॉ. नरेंद्र जाधव भावनिक शब्दांत म्हणाले ,“प्रा. जे.एफ. पाटील हे माझे परमस्नेही होते. त्यांच्या नावाने माझ्या आयुष्यातील ७५ वा पुरस्कार मिळणे, ही माझ्यासाठी मोठी आनंदाची बाब आहे,”
‘भारतीय अर्थव्यवस्थेचे भवितव्य : संधी व आव्हाने’ या विषयावर आपले विचार मांडताना डॉ. जाधव म्हणाले, “भारत हा लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा सर्वात मोठा लाभार्थी आहे. परंतु तो लाभ योग्य रित्या वापरला नाही, तर तो आपत्तीमध्ये परिवर्तित होऊ शकतो. यासाठी शिक्षण व सार्वजनिक आरोग्य या क्षेत्रांवर अधिकाधिक गुंतवणूक करण्याची गरज आहे.”
देशातील संपत्तीच्या असमान वाटपाकडे लक्ष वेधत त्यांनी सांगितले की, “अवघ्या १० लाख लोकसंख्येच्या ‘ऑक्टोपस क्लास’कडे देशातील ८० टक्के संपत्ती केंद्रित आहे. उच्चवर्णीयांकडे ४१ टक्के, तर मागासवर्गीयांकडे केवळ ११ टक्के संपत्ती आहे. शेती उत्पादकता जगात सर्वात कमी असून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग बिकट अवस्थेत आहेत. धोरणकर्त्यांनी या वास्तवाचा गांभीर्याने विचार करून उपाययोजना केल्या पाहिजेत.”
डॉ.जाधव पुढे म्हणाले “विसाव्या शतकात अमेरिका, युरोप व जपान हे विकासाचे केंद्र होते. परंतु आता अमेरिका ढासळत्या अवस्थेत आहे, तर चीन, रशिया आणि भारत ही नवी केंद्रे ठरत आहेत. भारताने आता अमेरिकेवर अवलंबून राहून चालणार नाही.”
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, “डॉ. जे.एफ. पाटील हे एक उत्तम अर्थशास्त्रज्ञ आणि उत्तम माणूसपण जपणारे व्यक्तिमत्व होते. विद्यार्थ्यांविषयीची त्यांची आस्था आणि सहज भाषेत केलेले अर्थसंकल्प विश्लेषण कायम लक्षात राहील. प्रत्येक विद्यार्थ्याने डॉ. जाधव यांचे ‘आमचा बाप अन् आम्ही’ हे आत्मचरित्र वाचले पाहिजे.”
कार्यक्रमात माजी खासदार संजय मंडलिक, माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विविध अधिष्ठाते व विद्यापीठातील सर्व घटक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सुयेक परिवारासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. डॉ. जे. एफ. पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देताना संपूर्ण सभागृह भावनाविवश झाले. त्यांच्या आठवणींनी उपस्थितांच्या मनात अंगावर शहारे आणले आणि डोळ्यांच्या कडा ओलावल्या. हा क्षण त्यांच्या विचारांची, कार्याची व व्यक्तिमत्त्वाची पर्वतीय उंचीचे दर्शन घडविणारा होता.
स्वागत व प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख व मानव्य विद्याशास्त्र शाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांनी केले. सुयेकचे माजी अध्यक्ष डॉ. राहुल म्होपरे यांनी मानपत्राचे वाचन केले. नंदिनी पाटील व धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा